जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज पक्ष निरीक्षक भास्करराव काळे व जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत आगामी मंडळ यात्रा, मतदार यादी तपासणी, ओबीसी समाज मेळावा, सामाजिक न्यायाचे मुद्दे आणि स्थानिक समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस माजी आमदार संतोष चौधरी, एजाज मलिक, कल्पिता पाटील, संग्रामसिंह सूर्यवंशी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार बी. एस. पाटील, भैय्यासाहेब रविंद्र पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, मंगला पाटील यांच्यासह जिल्हाभरातून पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत १ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात पक्षाच्या मंडळ यात्रेचे आगमन होणार असून, त्यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले. शहरातील सर्व प्रमुख मंदिर, मशीद, चर्च येथे स्वागत व अभिवादनाचे कार्यक्रम होणार असून, सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे.

पक्ष कार्यालयात ओबीसी समाजाचा विशेष मेळावा घेण्यात येणार असून, समाजातील प्रश्नांवर विचारविनिमय केला जाणार आहे. संध्याकाळी या यात्रेचे स्वागत धरणगाव येथे होईल आणि त्यानंतर अमळनेर येथे भव्य जाहीर सभा होणार आहे.
यावेळी मतदार यादीसंदर्भातील त्रुटी आणि त्याची तपासणी हाही महत्त्वाचा मुद्दा ठरला. कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील मतदार याद्या काळजीपूर्वक तपासाव्यात, असे आवाहन करण्यात आले. यासोबतच, जळगावातील सुलेमान खान प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. शेंदुर्णी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना गंभीर असून, त्या ठिकाणी तातडीने नवीन पुतळा बसवावा, अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.
मतदार यादी कामकाजात डीएलओ यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.
या बैठकीत विविध पक्षीय आणि सामाजिक विषयांवर व्यापक चर्चा होऊन आगामी काळात पक्ष अधिक प्रभावीपणे जनतेमध्ये पोहोचेल, असा विश्वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला.



