मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठींबा दिला असला तरी आज मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सत्यजीत तांबे यांच्या तंबूत दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. यात अनेक उमेदवार असले तरी प्रामुख्याने अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महविकास आघाडी समर्थीत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात मते मागितली.
दरम्यान, आज सकाळपासून मतदान सुरू झाल्यानंतर सत्यजीत तांबे यांच्या टेंटमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचे दिसून आले. यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील हे देखील बराच वेळ येथे उभे राहून मतदारांना आवाहन करत असल्याचे सर्वांनी पाहिले. दरम्यान, यू. डी. पाटील यांचा फोटा सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अर्थात, येथे आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.
दरम्यान, लाईव्ह ट्रेंडस न्यूजने या संदर्भात यू. डी. पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावर ते म्हणाले की, मी सत्यजीत तांबे यांना पाठींबा दिलेला नसून तंबूत सहज उभे होतो. याचा कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.