राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर या घटनेचे विविधांगी विश्लेषण करण्यात येत आहे. याबाबत ख्यातनाम वक्ते, लेखक तथा छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे यांनी केलेले हे बेधडक आणि हटके असे भाष्य !
मी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वोसर्वा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे बाबत शापित आधारवड! सारे असे थंड कसे ! असा एक लेख सोशल मीडियात लिहिला होता. तो फेसबुक, व्हाटसअप आदी माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याचे मोठे पडसाद देखील उमटले होते.
खरं तर, गेल्या ४०- ४२ वर्षांमध्ये शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये साम-दाम-दंड-भेद ही निती वापरून स्वतःचा प्रभाव निर्माण करून ते अनेक वर्ष सत्तेत राहिले. सत्तेत असताना शरद पवारां मुळे अनेकांनी सत्तेची फळे चाखली. अनेक लाभार्थी झाले.कुणी मोती झाले कुणी कोट्याधीश झाले, कुणी आमदार झाले, कुणी मंत्री झाले, कुणी सहकारी संस्थांचे कारभारी झाले तर कोणी बँकेचे साखर कारखान्यांचे चेअरमन झाले !
सद्यस्थितीतसह गेल्या अनेक वर्षात शरदचंद्र पवारांची अनेकांनी टिंगलटवाळी करीत बेफाम आरोप सुरू केले. तेव्हा या लाभार्थ्यां मधील एकाच्याही तोंडून आरोप करणार्यांच्या विरोधात ब्र काढण्याची हिंमत झाली नाही. हा शरद पवारांचा उभ्या कारकीर्दीतील पराभव आहे, हे मला वाटले म्हणून मी शापित आधारवड != सारे असे थंड कसे!= हा लेख लिहिला.
सदर लेख लिहिल्यानंतर त्यांच्या पक्षातील निष्ठावंत असलेल्या माझ्या अनेक मित्रांनी मला फोन करून हे तुमचे लिखाण योग्य नसल्याची नाराजी व्यक्त केली. तेव्हा मी त्यांना सुचविले की तुम्ही माझ्या लिखाणाचं जाहीरपणे खंडन करा. तेव्हा ते हतबल झाले. याचाच अर्थ पवार साहेबांच्या सत्तेचे वाटेकरी लाभार्थी, दलाल व फायदा घेणारे कुणीही त्यांच्यावर होणार्या बेफाम आरोपांना उत्तर देण्याच्या लायकीचा वा हिम्मत वाला नव्हता. हेच सिद्ध झालेले आहे.
दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांचे सख्खे पुतणे अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षा विरुध्द म्हणजे शरद पवार साहेबां विरुद्ध बंड पुकारुन आपल्या नऊ सहकार्यांसह ते महाराष्ट्राच्या सत्तेत सामील झाले. तेव्हापासूनचे रंगलेले नाट्य हे अवघा देश पाहतो आहे. अनेक जण भाबळेपणाने हे पवार साहेबांचेच तर राजकारण नाही ना? या प्रश्नांमध्ये गुरफटलेले आहेत. म्हणजे हा भूकंप बिलकुल नाही. हे तर भ्रष्ट कारभार करुन अडचणीत आलेल्या कारागृहात जाण्याची भिती असलेल्या राजकीय सत्तालोलुपांचे लाचार बंड असल्याची बाब उघड आहे.
काल संध्याकाळी मी त्यांच्याच पक्षाच्या अफाट संपत्ती असलेल्या आणि तेंदूपत्ता व्यवसायात गडगंज झालेल्या नेत्याची मुलाखत ऐकत होतो. खरं म्हणजे हे १००% व्यापारी यांना कुठल्याही पक्षाशी घेणं देणं नाही. आपला व्यापार चालला पाहिजे आणि आपले आर्थिक बळ वाढले पाहिजे.सत्तेची सुत्रे ताब्यात असली पाहिजे. या भूमिकेतून कुठल्या तरी पक्षात आपलं बळकट स्थान निर्माण करायचं आणि हळूहळू तो पक्ष ताब्यात घ्यायचा तशीच परिस्थिती या महोदयांनी पवारांच्या पक्षात निर्माण केली. पवारांचा विश्वास संपादन केला.तस पवारांचं राजकारण सुद्धा अर्थकारणावर आणि व्यापारी तत्त्वावर असल्यामुळे त्यांचा पुरेपूर फायदा यांनी घेतला. पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून केंद्रात मंत्री पदही पटकावलं आणि आपल्याकडे पवारांच्या पक्षाचे विदर्भाचे नेतृत्व खेचून आणलं. संपूर्ण पक्षात आपलाच शब्द चालला पाहिजे. असं स्वतःभोवती वलय निर्माण करण्यात हे यशस्वी झाले.
शरद पवारांच्या पक्षाचे विदर्भामध्ये दत्ता मेघे सारखं एक समर्थ नेतृत्व होत तेव्हा विदर्भात पवारांच्या पक्षाचे दोन आकडी आमदार निवडून येत होते. या पवारांच्या या अती विश्वासु धनदांडग्या नेत्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हाताशी धरून पहिल्यांदा दत्ता मेघेंचं खच्चीकरण करत त्यांना पक्षाच्या बाहेर जाण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर इतरांना हाताशी धरून अनिल देशमुख यांचे काय हाल केले हे महाराष्ट्र पाहतो आहे. आज तर हे नेते संपूर्ण पक्ष ताब्यात घेऊन पवारांचे सुद्धा खच्चीकरण करताहेत असा दृश्य पाहायला मिळते आहे. यांचे कुठल्यातरी एअरलाइन्सच्या घोटाळ्यात नाव आलं त्यांच्या अनेक प्रॉपर्टया ही ईडीने जप्त केल्या अशा सुद्धा मध्यंतरी बातम्या आल्या. याचाच परिपाक म्हणून ते लाचारांसोबत बंडात सहभागी झाले.
राष्ट्रवादी बाबतीत दुसरा अत्यंत गंभीर विषय सुध्दा उत्तर महाराष्ट्र अनुभवतो आहे.नाशिक ते जळगाव पर्यंत हा पूर्ण परिसर कधीकाळी पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा होता. जसे विदर्भामध्ये दोन आकडी आमदार पवारांचे होते आज त्याची संख्या एक आकडी नियोजनबद्ध करण्यातआली आहे. उत्तर महाराष्ट्र परिसरामध्ये स्वतःला समतेचे तसेच फुले- शाहू-आंबेडकरांचे वारसदार सांगणार्यांनी ज्याच्या कडे पवारांनी संपूर्ण विश्वासाने जबाबदारी सोपवली, प्रतिष्ठेची मंत्रीपदे दिली त्यांनीच पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची वाढ करण्या ऐवजी पक्षाची वाढ खुंटवुन खच्चीकरण केले. हे नाशिक करांनी चांगले अनुभवले. आपल्याला डोईजड होणार्यांना निवडणुकीत पाडायचे षडयंत्र केलं.सर्वकाही आपल्याच घरी या साठी भल्याभल्यांना घराची वाट दाखवली. उत्तर महाराष्ट्रातील शरद पवारांचा संपूर्ण गड उध्वस्त केला. हे महोदय इथेच थांबले नाहीत तर पवारांच्या नाकावर टिच्चून मराठा आरक्षणाला टोकाचा विरोध केला.ईतर समाजामध्ये मराठा द्वेष निर्माण केला मराठा समाज ठरवून अस्वस्थ केला गेला.
जे नाशकात झाले ते खान्देशात आणि त्यात देखील जळगाव जिल्ह्यात घडले. २००९ साली पक्षाचे पाच तर एक अपक्ष समर्थक मिळून 6 आमदार निवडून आल्यानंतर वरिष्ठांनीच पक्षातील नेत्यांना आपसात झुंजविले. निष्ठावंतांना पदे देण्यापेक्षा धनाढ्य सराफा पेढीवाले आणि त्यांच्या पुत्राचे लाड पुरवण्यात आले. याचीच परिणिती म्हणजे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अवघा एकच आमदार असून तो देखील अजितदादांच्या साथीला जाऊन उभा असल्याचे दिसून येत आहे.
दिल्लीत ओबीसींचे महामेळावे घेतांना शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष साडेतीन जिल्ह्या पुरताच मर्यादीत ठेवायचा हेच नियोजन या त्यांच्याच खासमखास सहकार्यांनी केले. पुणे जिल्ह्यातील वळसेंनी पवारांना सोडून सत्तेसाठी वळसा का घेतला. त्यांचे रिमोट कंट्रोल व्यापारी कोण? अशा हजारो फुटिरांना पवारांनी सांभाळलं मोठ केल. का सांभाळल हा गहन प्रश्न आहे. आज तेच पवारांच्या पक्षाला मुठमाती देऊन फुले-शाहु-आंबेडकर यांची तत्त्वे बासनात बांधून सत्तेचे लाचार वासी होउन मंत्री झाले आहेत. याचा अर्थ व्यापारी राजकारणाचा शेवट असाच होणार होता. तो झाला. परिणामी सत्तेच्या साठमारीत पवारांच्या राष्ट्रवादी चे लाखो कार्यकर्ते स्वतःच्या भवितव्याच्या चिंतेत अस्वस्थ आहेत.
काल पवार साहेबांना एका पत्रकाराने त्यांच्या पक्षातील आश्वासक चेहर्या बाबतीत विचारले असता. पवार साहेब स्वतःचेच नाव सांगुन मोकळे झाले. अनेकांना त्यांचे कौतुक वाटले. याचाच अर्थ पवार साहेब चाळीस वर्षात नवीन निष्ठावान नेतृत्व निर्माण करू शकले नाही हाच होतो. अलीकडेच पुण्यात बालगंधर्व मध्ये पवार साहेबांच्या हस्ते झालेल्या नागरी सत्काराला उत्तर देतांना जेष्ठ पत्रकार चित्रलेखा चे संपादक ज्ञानेश महाराव स्पष्टच बोलले की, फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेऊन सत्तेसाठी कोणत्याही टोकाला जाणारी राजकीय जमात या महाराष्ट्रातच आहे. या वेळी मला कवी सुरेश भट याची एक कविता आठवली आहे. ते लिहितात.
झोपला घाणीत माझा देश हा बापू!
मी कशासाठी फुलांचे गीत आलापू !
मी भरोसा ही धरावा आज कोणाचा! हा … …..तो……….तो…………. बस एवढेच.
अशोक एस.शिंदे
संस्थापक अध्यक्ष:
छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड
संपर्क क्रमांक : ९४२२२८३२३३