सोलापूर (वृत्तसंस्था) मागील अनेक दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सर्वांना उत्सुकता होती. परंतु आज अखेर संजय शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करताच त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच शिवसेना-भाजप यांच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बारामती येथील एका सभेदरम्यान, संजय शिंदे हे घरातलेच आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे का म्हणायचे? अशी विचारणा करत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघातर्फे आणि काँग्रेसच्या सहमतीने मी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतो, असे सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळालेले रणजितसिंह मोहिते पाटील यांना विरोध करण्यासाठी संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. वास्तविक मोहिते पाटलांना भाजपात प्रवेश देण्यापूर्वी संजय शिंदे यानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी माढ्याच्या उमेदवारीसाठी विचारणा केली होती. संजय शिंदे हे माढा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू आहेत. ते मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात.