अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक व एनसीसी अधिकारी समाधान हरी पाटील यांना एनसीसी सेवेत महत्त्वाची पदोन्नती मिळाली असून त्यांची एनसीसी थर्ड ऑफिसरवरून सेकंड ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सन्मानामुळे शाळा, संस्था व एनसीसी वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अमळनेर येथे आयोजित कार्यक्रमात एनसीसी कमांडिंग ऑफिसर अमित रे तसेच एनसीसी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पिनाकी बेनिक यांच्या हस्ते समाधान पाटील यांच्या गणवेशावर दोन स्टार लावून त्यांना सेकंड ऑफिसर पदाची अधिकृत पदोन्नती प्रदान करण्यात आली. यावेळी एनसीसीच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला एनसीसीचे एस.एम., जे.सी.ओ. तसेच पी.आय. स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्त, देशभक्ती व नेतृत्वगुणांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी एनसीसीचे कार्य महत्त्वाचे असून, समाधान पाटील यांच्या पदोन्नतीमुळे हे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय आबासो हेमकांत पाटील, सचिव माननीय दादासो संदीप घोरपडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक माननीय सुनील पाटील तसेच साने गुरुजी परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समाधान पाटील यांचे अभिनंदन व कौतुक केले.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त व सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी समाधान पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल म्हणून ही पदोन्नती मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या या यशामुळे विद्यालयातील विद्यार्थी तसेच एनसीसी कॅडेट्समध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.



