खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव या संस्थेच्या शैक्षणिक दर्जाचे व अधोरेखित प्रगतीचे प्रतीक म्हणून नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडीटेशन (NBA), नवी दिल्ली येथील तज्ज्ञ समितीने नुकतीच १२ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान भेट दिली. संगणक व विद्युत अभियांत्रिकी विभागासाठी राष्ट्रीय मानांकन मिळविण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली असून, समितीच्या एकंदर भूमिकेवरून यंदा या विभागांना मानांकन मिळण्याची शक्यता बळावली आहे.
एनबीए समितीच्या या तीन दिवसांच्या दौऱ्यात चेअरमन आणि दोन विषयतज्ज्ञ सदस्यांचा समावेश होता. समितीचे स्वागत झाल्यानंतर संस्थेचे प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून संस्थेची सविस्तर माहिती दिली. उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत संस्थेची शैक्षणिक आणि प्रशासकीय पारदर्शकता अधोरेखित केली.
दौऱ्यात समितीने शैक्षणिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, वाचनालय, वसतीगृहे, क्रीडा सुविधा, मुलींसाठी स्वतंत्र विश्रामकक्ष, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, प्रशिक्षण आणि आस्थापना कक्ष आदी सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्याचबरोबर विविध विभागांची कागदपत्रे, समित्यांचे कार्य, कार्यालयीन नोंदी, शिष्यवृत्ती, पगारपत्रक व इतर शासकीय कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली.
संगणक व विद्युत अभियांत्रिकी विषयतज्ज्ञांनी दोन्ही विभागांतील अध्यापन पद्धती, प्रयोगशाळेतील सत्रे, अभ्यासक्रमाचे नियोजन, अंतर्गत मूल्यमापन प्रणाली यांची बारकाईने तपासणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून शैक्षणिक अनुभव जाणून घेतले. या संवादातून विद्यार्थ्यांची समाधानकारक प्रतिक्रिया समितीला मिळाली.
१३ सप्टेंबर रोजी संस्थेत माजी विद्यार्थी, उद्योजक आणि पालक यांची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संस्थेच्या योगदानाविषयी सकारात्मक अभिप्राय देण्यात आला. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘एक्झिट मीटिंग’मध्ये समितीने संस्थेच्या धोरणे, अंतर्गत गुणवत्ता प्रणाली, सामाजिक जबाबदारी, अभिप्राय व्यवस्थापन यावर चर्चा करत संस्थेचे काही उत्कृष्ट व सुधारणा अपेक्षित मुद्दे समोर ठेवले.
या दौऱ्यानंतर प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, “ही भेट केवळ औपचारिक तपासणी नव्हे तर संस्थेच्या भविष्यदृष्टीला दिशा देणारा प्रेरणादायी अनुभव ठरला. संस्थेच्या सामर्थ्यांचे आणि सुधारणेच्या गरजांचे वस्तुनिष्ठ आकलन या निरीक्षणामुळे झाले असून, हे मार्गदर्शन आमच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचे ठरेल.”
या यशस्वी आयोजनामागे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक प्रा. मनोज अंधारे यांचे मार्गदर्शन लाभले. संगणक विभागप्रमुख प्रा. संदीप परांजपे, विद्युत विभागप्रमुख प्रा. मनोज मुंदडा, समन्वयक डॉ. प्रसाद बाहेकर, उपसमन्वयक प्रा. सोहन चोपडे, प्रा. राजेश मंत्री, प्रा. अंकुश दवंड, प्रा. सचिन सोनी, प्रा. समीर कुलकर्णी यांच्यासह संस्थेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे ठरले.
एनबीए मानांकन मिळविण्याच्या प्रक्रियेत खामगावच्या शासकीय तंत्रनिकेतनची ही पायरी शिक्षणाच्या गुणवत्तेची आणखी उंची गाठण्याचे संकेत देत आहे. ही भेट संस्थेच्या शैक्षणिक आणि व्यवस्थापनात्मक क्षमतेचे प्रतिक ठरली असून, विद्यार्थी व पालकांमध्ये नव्या आशा निर्माण करत आहे.



