जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा कार्यालय मार्फत महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला स्वयंसहायता बचत गटावर आधारीत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे.
महिलांच्या शाश्वत उपजिविका निर्माण करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून उपजिविका विकास घटकाअंतर्गत महिला स्वयंसहायता बचत गटातील महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच महिलांमध्ये विक्री कौशल्य वृद्धिंगत व्हावेत यासाठी माविमच्या स्वर्ण महोत्सवी वर्ष व जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री अर्थात “नवतेजस्विनी महोत्सव” येत्या १५ मार्च ते दि. १७ मार्च २५ या कालावधीत शानबाग सभागृह एम.जे. कॉलेज रोड, हायवे चौफुली जळगाव येथे आयोजित करण्यात येत आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरु असणार आहे.
या प्रदर्शनात खान्देशी मसाले, बिबड्या, पापड, लोणची कुरडया, हस्तकलेच्या वस्तु, खाद्य पदार्थ ज्वारी, नाचणी, बाजरी पासून बनविलेले पदार्थ’, गारमेंट इ. वस्तु विक्री साठी उपलब्ध असतील. तसेच या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. महिलांच्या उत्पादनांस बाजार पेठ उपलब्ध व्हावी यासाठी खरेदीदार विक्रेता बैठक आयोजित करण्यात येणार आहे. प्रदर्शनात सहभागी महिलांना आरोग्याविषयी माहिती देण्यात येऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि.१५ मार्च रोजी दु.४.०० वा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते होणार आहे तर यावेळी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधिक्षक मा.डॉ महेश्वर रेड्डी, जिल्हा कृषि अधिक्षक कुर्बान तडवी, प्रमुख शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद डॉ हेमंत बाहेती, प्रमुख शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रफिक तडवी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रणव झा, जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड अमित तायडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, विभागीय सल्लागार शैलेश पाटील यांची विशेष उपस्थिती असेल. तरी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन बचत गटातील महिला उद्योजकांना प्रोत्साहीत करावे असे आवाहन माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे यांनी केले आहे.