Home धर्म-समाज जे. टी. महाजन स्कूलमध्ये ‘नवदुर्गा’ अवतरल्या; सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले लक्ष

जे. टी. महाजन स्कूलमध्ये ‘नवदुर्गा’ अवतरल्या; सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले लक्ष


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शारदीय नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून येथील जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्र आणि दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. नऊ दिवस चाललेल्या या उत्सवात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे भारतीय परंपरेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवले.

नवरात्रौत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये विद्यार्थिनींनी देवीच्या नऊ विविध रूपांची (नवदुर्गा) वेशभूषा साकारून त्यावर आधारित नृत्य सादर केले, ज्याला उपस्थितांनी मोठी दाद दिली. यासोबतच, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या इयत्तेसाठी गरबा नृत्य आणि संगीत खुर्ची यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य श्री. मोझेस जाधव यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या उत्सवाची सांगता १ ऑक्टोबर रोजी आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य मोझेस जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर पर्यवेक्षिका पुनम नेहेते यांच्या हस्ते सरस्वती पूजन व शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींचे ‘कन्यापूजन’ करण्यात आले. यावेळी लहान मुलींना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले ‘त्रिदेवी तांडव’ आणि चौथी ते सहावीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले ‘नवदुर्गा नृत्य’ विशेष लक्षवेधी ठरले. दसऱ्याच्या परंपरेनुसार, विद्यार्थ्यांनी आणलेल्या आपट्याच्या पानांचे (सोनं) आणि प्रतिकात्मक शस्त्रांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘रावण दहनाचा’ प्रसंग. राम, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी हा प्रसंग जिवंतपणे सादर केला.

याप्रसंगी शिक्षिका माधुरी बेंडाळे यांनी नवरात्रीचे आणि शिक्षक चेतन फेगडे यांनी दसऱ्याचे महत्त्व आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना महाजन यांनी केले. या सोहळ्यासाठी प्राचार्य, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound