यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक १० एप्रिल रोजी खरेदी विक्री शेतकी सहकारी संघाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसह मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे व जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या एसआयआर (Special Intensive Revision) मतदार यादी अद्ययावत प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रक्रियेत पक्षाचे बीएलए पदाधिकारी नियुक्त करून बीएलओ अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीत आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारित करणे, तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून जनतेशी संपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणूक प्रक्रियेत काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध संघटन आणि जनसंपर्क वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. बैठकीत पक्षाच्या तालुका व शहर पातळीवरील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या बैठकीस सारंगधर अडकमोल, हाजी युसूफ शेठ, तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, नगरसेवक अन्वर खाटीक, शहराध्यक्ष अन्सार खान, अब्दुल सईद, ललित पाटील, शेख अन्वर साकली, यशवंत बापू जासुद, हाजी अकबर खाटीक, महिला अध्यक्ष ममता अमोदकर, भैय्या पाटील, वसंत पाटील, पितांबर महाजन, नरेंद्र पाटील, हितेश गजरे, किरण पाटील, प्रसन्न पाटील, कामराज घारू, शेख उस्मानभाई, सद्दाम शेठ, विजय साळी, भगवान बरडे, आबिद कच्ची, जाहिद कुरेशी, अब्दुल एजाज, निलेश आमोदकर, एजाज मण्यार, तुषार येवले, निलेश बेलदार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



