जळगावात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ संपन्न – नैतिकतेने मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.२५ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात आला.

मतदानाला मिळणारा अल्पप्रतिसाद हा लोकशाहीला मारक ठरत असून कोणत्याही आमिषाला बळी न पडता नैतिकतेने मतदान केल्यास साने गुरूजींना अपेक्षित असलेला बलशाली भारत निर्माण होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.२५ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात आला. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज अशिया, म.न.पा. आयुक्त सतिश कुलकर्णी, दीपस्तंभचे संचालक यजुर्वेद महाजन उपस्थित होते.

श्री राऊत म्हणाले की, “मतदार नोंदणीसाठी सातत्याने प्रशासनाकडून मोहिमा राबविल्या जात आहेत. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत. मतदारांनी या मोहिमांना प्रतिसाद द्यावा” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांनी, “लोकशाही अधिक बळकट व्हावी आणि लोकाभिमूख व्हावी यासाठी मतदान हा एकमेव महत्वाचा पर्याय आहे. आणि त्यासाठी मतदार यादीत सर्वांनी आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.” असे मत व्यक्त केले.

पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांनी, “शहरी भागात मतदानाचे प्रमाणे वाढावे यासाठी सजगता वाढवावी लागेल. मतदारांनी भ्रष्ट न होता मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन त्यांनी केले. यजुर्वेंद्र महाजन यांनी तरूणांना संबोधतांना सकारात्मक बोला, देशासाठी उक तरी कृती करा, विचार करायला सुरूवात करा आणि मतदान करा. अशी चतु:सुत्री दिली.”

यावेळी तुळजाई बहुउद्देशिय संस्थेच्या कलावंतांनी पथनाट्य सादर केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्रास्ताविक केले. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्या संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली. चार नवमतदारांना प्रातिनिधीक स्वरुपात ई-मतदार ओळखपत्र देण्यात आले. निवडणूकीचे उत्तम काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशासनाकडून मतदान विषयक घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. अपूर्वा वाणी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. नामेदव पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा.आर.एल. शिंदे, सुनील सुर्यवंशी, महेश मुधळकर, किरण सावंत पाटील, नितीन देवरे आदी उपस्थित होते.

Protected Content