Home Cities जळगाव गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणादायी कामगिरीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ऑलम्पिक स्पर्धेत जेव्हा भारताचा गोल स्कोर शून्य होता, तेव्हा महाराजांनी ध्यानचंद यांना “कुछ तो करो ध्यान” असे म्हटले आणि काही मिनिटांतच ध्यानचंद यांनी चार गोल करत परिस्थितीच पालट केली. त्यांच्या अप्रतिम खेळाने त्या काळातील जर्मनीचे हुकूमशहा हिटलरही प्रभावित झाले. त्यांनी ध्यानचंद यांना जर्मन आर्मीमध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले होते; मात्र त्यांनी देशाप्रती निष्ठा ठेवत त्यास नकार दिला.

डॉ. वारके यांनी पुढे सांगितले की धैर्य, सातत्य आणि टीमवर्क या गुणांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मेजर ध्यानचंद होय. त्यांच्या खेळातून शिकण्यासारखे अनेक धडे आजच्या पिढीला मिळतात. खेळ हे केवळ शारीरिक तंदुरुस्तीचे साधन नसून टीमवर्क आणि नेतृत्वगुण विकसित करणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी टग ऑफ वॉर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. चंद्रकांत डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना क्रीडा संस्कारासोबतच मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली.


Protected Content

Play sound