जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकविसावे शतक हे अत्यंत धकाधकीचे आणि धावपळीचे आहे. अशा या धावत्या युगात क्रीडा क्षेत्र देखील झपाट्याने वाढत आहे. त्यासाठीच क्रीडा क्षेत्रात क्रीडा वैद्यकशास्त्र आणि पुनर्वसन याच्याशी निगडीत बाबींचा अंतर्भाव करणे महत्वाचे ठरेल, असा सूर याबाबतच्या चर्चासत्रातील तज्ज्ञांच्या विचार मंथनातून उमटला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय (भुसावळ) यांच्या संयुक्त विद्यमाने “शारीरिक शिक्षण, क्रीडा वैद्यकशास्त्र आणि पुनर्वसन” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र झाले.
या चर्चासत्रामध्ये देशभरातून बहुसंख्य संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट तथा विद्वत्त परिषद सदस्य प्रा. सुरेखा पालवे आणि आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. साहेबराव भुकन हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. मंचावर प्राचार्य डॉ. राजू फालक, प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. गोविंद मारतळे, डॉ. आनंद उपाध्याय आणि डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.निलेश जोशी यांनी केले. डॉ. संजय चौधरी यांनी आभार मानले.
डॉ. सागर कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर) यांनी क्रीडा वैद्यकशास्त्राची “क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेतून असणारी व्याप्ती” या विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. गोविंद मारतळे (फैजपूर), डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर (जळगाव) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्रात अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी पेपर सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने अश्विनी मालकर, भाग्यश्री भिलारे, ऋतुजा देऊळकर, साहिल भालेराव, राजेंद्र जंजाळे आणि चंद्रशेखर पाटील यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. नीतू जोशी आणि डॉ. आनंद उपाध्याय यांनी भूषविले.
समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे यांनी मार्गदर्शन केले. डॉ.नीतू जोशी यांनी या चर्चासत्राबद्दल अभिप्राय नोंदवला. चर्चासत्र यशस्वीतेसाठी डॉ. संजय चौधरी, प्रा. प्रवीण कोल्हे, डॉ. पंकज पाटील, प्रा. आकाश बिवाल तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.