
फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी द्वितीय वर्ष विज्ञान वर्गातील कु. सायमा तडवी व कु. सादिया खान यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आधुनिक युगातील विज्ञानाची गरज, दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि तरुणांनी संशोधनाकडे वळण्याची आवश्यकता यावर प्रभावी भाष्य केले. त्यांच्या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. योगेश तायडे यांनी विविध नामांकित शास्त्रज्ञांच्या संशोधनकार्याचा आढावा घेत विज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोग, संशोधन आणि नवकल्पनांवर भर द्यावा, असे आवाहन केले. विज्ञानामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डी. बी. तायडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून संशोधनामध्ये रुची निर्माण करावी, असे सांगितले. जिज्ञासा, चिकाटी आणि सातत्य या गुणांमुळेच विज्ञान क्षेत्रात यश मिळते, असे त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बी. वाघूळदे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्द व चिकाटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. चीन, जपान, अमेरिका आणि रशिया यांसारख्या जागतिक महासत्तांप्रमाणे भारतालाही विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. विशेषतः अधिकाधिक मुलींनी संशोधन क्षेत्रात पुढे येऊन देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. ए. के. पाटील, डॉ. राकेश तळेले, डॉ. शेरसिंग पाडवी, प्रा. अचल भोगे, प्रा. नाहीदा कुरेशी, प्रा. हंशाली महाजन, प्रा. चैताली पाटील, प्रा. पुजा महाजन तसेच सुजित भाट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी भंगाळे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. मच्छिंद्र पाटील यांनी सादर केले. आभार प्रदर्शन प्रा. विकास वाघुळदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जितू चौधरी, अरुण सैंदाणे व श्री. सिद्धार्थ तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच, राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची जिज्ञासा अधिक वृद्धिंगत झाली असून संशोधन आणि नवसर्जनाची प्रेरणा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



