जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत ‘राष्ट्रीय नमुना पाहणी ८० वी फेरी’ अंतर्गत आरोग्य व पर्यटन विषयक सर्वेक्षणाला जळगाव जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या पाहणीमध्ये राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचाही सहभाग आहे. या सर्वेक्षणातून निवडक कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांत आरोग्य आणि देशांतर्गत पर्यटनावर झालेल्या खर्चाची सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे.
सर्वेक्षणाचे उद्दिष्ट
या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट सार्वजनिक आणि खासगी आरोग्य सेवांवर होणाऱ्या खर्चाची माहिती मिळवणे आहे. यामध्ये रुग्णालये व दवाखान्यांमधून मिळालेल्या उपचारांवर झालेला खर्च, लसीकरणाचा खर्च आणि गर्भवती महिलांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती संकलित केली जाईल. ही माहिती शासनाला भविष्यात आरोग्यविषयक धोरणे आणि कार्यक्रम आखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

नागरिकांच्या सहभागाचे आवाहन
या सर्वेक्षणासाठी अशा कुटुंबांची निवड केली जाईल, ज्यांच्याकडे एक वर्ष किंवा त्याहून कमी वयाचे बाळ आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मागील ३६५ दिवसांत रुग्णालयात दाखल झाली होती. सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. या पाहणीची गुणवत्ता आणि वस्तुनिष्ठता राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक मनोहर चौधरी यांनी नागरिकांना आपल्या आरोग्यविषयक खर्चाची अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.



