चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील उपजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत तेरा कर्मचारी आपल्या विविध मागण्या आणि शासनाच्या अपूर्ण अंमलबजावणीविरोधात १९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत. शासनाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या निर्णयानंतरही आजतागायत कुठलीही ठोस कृती न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या आंदोलनाबाबत कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पाटील यांना लेखी निवेदन सादर करून आपली भूमिका स्पष्ट केली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शासन अपयशी ठरले असून, केवळ चालक आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांनाच सामावून घेण्यात आले आहे. इतर संवर्गांतील कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

शासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शासन सेवेत तात्काळ समावेश, मानधन वाढ, रॉयल्टी बोनस, ईपीएफ आणि इन्शुरन्स योजनेची अंमलबजावणी तसेच स्थानांतर धोरणाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांकडे सरकारने वेळेत लक्ष न दिल्यास आरोग्य यंत्रणेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
या बेमुदत संपात सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये दीपक सावंत, अजय माळी, कमलेश बडगुजर, सी.एस. साळुंके, एस.एस. पावरा, शर्मिला वळवी, दीपाली सोनवणे, दिव्या सोनवणे, मीना बारेला, सुनिता सोनवणे यांचा समावेश आहे. यावेळी सर्व कर्मचारी संघटितपणे उपस्थित होते आणि आपल्या मागण्यांचे निवेदन वैद्यकीय अधीक्षकांना सादर करताना भावनिक वातावरण निर्माण झाले.
या संपामुळे उपजिल्हा रुग्णालयातील दैनंदिन सेवा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता असून, याचा फटका रुग्णांनाही बसू शकतो. प्रशासन आणि शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे, अशी मागणीही विविध स्तरातून केली जात आहे.



