जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रत्येक वर्षी १७ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा राष्ट्रीय एपिलेप्सी दिन हा मिरगीसंदर्भातील गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्याचा महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. मेंदूशी संबंधित असणाऱ्या या वैद्यकीय आजाराविषयी समाजात अजूनही भीती, अज्ञान आणि चुकीच्या धारणा प्रचलित आहेत. या पार्श्वभूमीवर महादेव हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी मिरगीविषयी सविस्तर माहिती देत जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
एपिलेप्सी किंवा मिरगी हा मेंदूमधील पेशींच्या अनियंत्रित विद्युत सिग्नल्समुळे होणारा आजार असून अचानक झटके येणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. झटक्यांदरम्यान व्यक्तीची जाणीव हरपणे, शरीर कडक होणे, थरथर कापणे, जीभ चावली जाणे किंवा अनैच्छिक हालचाली अशी अनेक लक्षणे दिसू शकतात. एकच झटका म्हणजे मिरगी असे नसून दोन किंवा अधिक अनपेक्षित झटके आल्यासच मिरगीचे निदान केले जाते, हे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

मिरगी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. काही वेळा त्याची कारणे समजत नाहीत, तर काहीवेळा मेंदूच्या दुखापती, इन्फेक्शन, जनुकीय कारणे, मेंदूतील गाठी किंवा विकासात्मक अडचणी यामुळेही मिरगी उद्भवू शकते. समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनेक गैरसमजांना त्यांनी उत्तर देत मिरगी हा संसर्गजन्य किंवा मानसिक आजार नसल्याचे स्पष्ट केले.
झटका आल्यावर योग्य पद्धतीने प्रथमोपचार करणे ही अत्यावश्यक बाब आहे. अशावेळी गर्दी दूर ठेवणे, व्यक्तीला जमिनीवर सुरक्षित झोपवणे, श्वासोच्छ्वास सुरळीत राहावा म्हणून बाजूला वळवणे आणि तोंडात काहीही न घालणे हे महत्त्वाचे आहे. झटका पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ चालल्यास किंवा सलग झटके येत असल्यास तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असते.
निदानासाठी EEG, MRI, CT Scan सारख्या तपासण्यांची आवश्यकता भासू शकते आणि योग्य औषधोपचारांनी हा आजार प्रभावीपणे नियंत्रित ठेवता येतो. अनेक रुग्ण सामान्य, सक्षम आणि यशस्वी जीवन जगू शकतात. केवळ सातत्याने औषधे घेणे आणि जीवनशैलीत आवश्यक बदल करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मिरगी रुग्णांविषयी समाजाची समजूतदार दृष्टी आणि आधार महत्त्वाचा असल्यावरही त्यांनी भर दिला. भेदभाव, भीती आणि अज्ञान दूर करून अशा रुग्णांना शिक्षण, नोकरी आणि सामाजिक आयुष्यात समान संधी देणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी व्यक्त केले.



