Home क्राईम दोषींवर कारवाईबाबत नाथजोगी समाजाचे पारोळा पोलीस स्टेशनला निवेदन

दोषींवर कारवाईबाबत नाथजोगी समाजाचे पारोळा पोलीस स्टेशनला निवेदन


पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील मौजे हिंगणा (वैजापूर) येथील श्री नवनाथ मंदिरात नवनाथ महाराजांच्या मूर्तींची अमानुष विटंबना झाल्याच्या घटनेचे पडसाद पारोळ्यात तीव्रतेने उमटले असून, समस्त नाथजोगी समाज व दशनाम गोसावी समाजाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

दि. २८ व २९ जानेवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी श्री नवनाथ मंदिरात प्रवेश करून नाथ संप्रदायाचे आराध्य दैवत श्री नवनाथ महाराज यांच्या मूर्तींची गळ्यापासून चेहऱ्यापर्यंत विद्रूपपणे तोडफोड केली. मंदिरात असलेल्या श्री गुरू दत्तात्रेय महाराज तसेच दादागुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज, श्री गोरक्षनाथ महाराज, श्री कानिफनाथ महाराज, श्री जालंधरनाथ महाराज, श्री भर्तरीनाथ महाराज, श्री गहिनीनाथ महाराज, श्री रेवननाथ महाराज, श्री नागेशनाथ महाराज आणि श्री चर्पटीनाथ महाराज यांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ पारोळा येथे तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांना समस्त नाथजोगी समाज व दशनाम गोसावी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नाथजोगी समाजाचे समाजबांधव, शहरातील नवनाथ भक्त तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

नाथ संप्रदायाची गुरु-शिष्य परंपरा ही प्राचीन आणि पवित्र असून श्री नवनाथ महाराज हे संपूर्ण नाथजोगी समाजाचे आराध्य दैवत आहेत. अशा प्रकारच्या निर्दयी व आक्षेपार्ह घटनेमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील नाथजोगी, दशनाम गोसावी, नाथबुवा, गिरी, जोगी, नाथ तसेच नाथ संप्रदायाला मानणाऱ्या वारकरी समाजाच्या धार्मिक भावना गंभीररीत्या दुखावल्या गेल्या असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस स्टेशन शेगाव येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम २९८ अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच शासनाने याबाबत कडक धोरण राबवावे, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. भविष्यात कोणीही अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, यासाठी कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

समस्त नाथजोगी समाज मंडळ, पारोळा यांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला असून, सात दिवसांच्या आत आरोपींना अटक करून कठोर कारवाई न झाल्यास राज्यघटनेने दिलेल्या न्यायाच्या हक्कानुसार शांततेच्या मार्गाने आखिल भारतीय नाथजोगी समाज आंदोलनाची भूमिका घेईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound