मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लवकर आपल्या पक्षात यावे असे साकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी आज त्यांना भेटून घातले आहे.
भाजपचे दिग्गज नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादीच्याच पदाधिकार्यांनी आज नाथाभाऊंना भेटून त्यांनी आपल्या पक्षात लवकर यावे असे आमंत्रण दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विद्यार्थी संगठना अध्यक्ष अमित पाटील, राष्ट्रवादीचे माजी महानगराध्यक्ष परेश कोल्हे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस संजय चव्हाण, माजी जिल्हा उपाध्यक्ष विदयार्थी काँग्रेस अजय बढे आदी पदाधिकार्यांनी एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस बळकटी साठी नाथा भाऊंनी राष्ट्रवादीत यावे अशी विनंती केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाथाभाऊ आल्यास बहुजन समाजातील एका नेत्याला खर्या अर्थाने न्याय मिळणार असून याचा अर्थातच पक्षाला लाभ होणार असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी या पदाधिकार्यांनी केले. यामुळे नाथाभाऊंनी तातडीने पक्षात प्रवेश घ्यावा असे साकडे देखील त्यांना घालण्यात आले.
एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत पक्षाचे जिल्ह्यातील नेते व पदाधिकार्यानीं सावध भूमिका घेतली असतांना आज पक्षाच्या पदाधिकार्यांनी थेट त्यांची भेट घेऊन साकडे घातल्याने याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.