जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता मधुकर नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे नशिराबाद परिसरातील पोलीस प्रशासनात एका नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

API योगिता नारखेडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात एक शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या अधिकारी म्हणून ओळख आहे. यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. विशेषतः कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी प्रतिबंध आणि महिला व बालकांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये त्यांनी केलेली कामगिरी अत्यंत प्रभावी ठरली आहे. त्यांच्या कामाच्या अनुभवाचा मोठा फायदा आता नशिराबाद परिसराला होणार आहे.

नशिराबाद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर नारखेडे यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली आहे. परिसरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करणे, वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीला लगाम घालणे आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवणे ही त्यांची प्राथमिकता असणार आहे. “पोलीस आणि जनता यांच्यातील संवाद वाढवून सर्वसामान्यांना त्वरित न्याय मिळवून देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
योगिता नारखेडे यांच्यासारख्या धडाडीच्या महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे नशिराबाद आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. त्यांच्या येण्याने गुन्हेगारांवर दहशत बसेल आणि प्रामाणिक नागरिकांना सुरक्षिततेचा आधार मिळेल, अशी भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. सध्या नशिराबाद परिसरात या “लेडी सिंघम” च्या एन्ट्रीची आणि त्यांच्या शिस्तप्रिय कार्यशैलीची जोरदार चर्चा सुरू आहे.



