
नशिराबाद लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नशिराबाद-जळगाव सर्व्हिस रोडवरील पार्श्वनाथ पेट्रोल पंपावर बुधवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पेट्रोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून मोठा तणाव निर्माण झाला. पंपावरील कर्मचारी आणि एका तरुणादरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेनंतर तरुणाने गावातील मित्र-नातेवाइकांना बोलावल्याने पंपावर मोठा जमाव जमला आणि त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही संपूर्ण घटना पंपावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांतील लोकांना चौकशीसाठी नशिराबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यामुळे पोलिस ठाण्याबाहेर दोन्ही गटांचे नातेवाईक व समर्थकांची मोठी गर्दी झाली. वातावरण अधिक तणावपूर्ण बनल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचा वापर करावा लागला, ज्यामुळे संतप्त जमावाने आरडाओरड केली.
या गंभीर घटनेनंतरही रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक आत्माराम मनोरे यांनी दिली.
दरम्यान, घटनेची माहिती घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी अरेरावीची वागणूक दिल्याचा आरोप नशिराबाद पत्रकार मंचने केला आहे. पत्रकार मंचने पोलिसांच्या या वर्तनाचा तीव्र निषेध नोंदवला आहे.



