
नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा प्रकरणात बुधवारी महत्त्वाची घडामोड घडली असून, अशोक खरात याला नाशिक सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अवघ्या पाच मिनिटांत पार पडलेल्या सुनावणीमुळे या प्रकरणाची गंभीरता आणि वेग अधोरेखित झाला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची कोठडी संपत असल्याने त्याला कडेकोट पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश श्रीमती बी. इन. ईचपुरानी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे उपस्थित होते. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी प्राथमिक मांडणी केली, न्यायालयाने काही महत्त्वाची कागदपत्रे तपासली आणि तपास अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर कोणताही सविस्तर युक्तिवाद न होता अवघ्या पाच मिनिटांत न्यायालयाने खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ही शिक्षा त्याच्यावर नोंद असलेल्या पहिल्या गुन्ह्यासाठी देण्यात आली असून, दुसऱ्या गुन्ह्याबाबत उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू असून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. तपासादरम्यान अशोक खरात चार वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे उघड झाले आहे. या मोबाईलमधील माहितीमुळे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच, या प्रकरणात खरातची पत्नी कल्पना खरात हिचाही सहभाग असल्याचा संशय असून ती सध्या फरार आहे. पोलिसांकडून तिचा शोध सुरू असून लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भोंदूगिरी, अघोरी विद्या आणि दैवी शक्तींचा दावा करत अशोक खरातने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर त्याची अटक झाल्यानंतर नाशिकमधील राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या काही बड्या राजकीय नेत्यांची नावे चर्चेत आल्याने या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.
सध्या अशोक खरातचा मुक्काम न्यायालयीन कोठडीमुळे कारागृहात असणार असून, पोलिसांकडून त्याच्या फसवणुकीचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. त्याने आणखी किती लोकांना गंडा घातला आहे, याचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



