बंगळुरू, वृत्तसंस्था | नासाच्या ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावरील विक्रमच्या लँडिंग साइटचे फोटो काढले असले तरी त्यातूनही नेमके चित्र स्पष्ट झालेले नाही. चंद्रावर रात्र सुरु होण्याआधी नासाच्या ऑर्बिटरकडून मिळणाऱ्या फोटोंमुळे विक्रम लँडरबद्दल नेमकी माहिती मिळेल, अशी भारतीयांना अपेक्षा होती. लँडर ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये नसल्यामुळे हे घडले असावे, असे नासाने म्हटले आहे.
नासाचा ऑर्बिटर गेल्या १० वर्षांपासून चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत आहे. मंगळवारी हा ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साइट जवळून गेला. चंद्रावर विक्रम लँडरकडून ज्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग अपेक्षित होते. त्या जागेचे फोटो ऑर्बिटरने काढले आहेत, पण लँडरचा नेमका फोटो मिळालेला नाही. १७ सप्टेंबरला ऑर्बिटरने चंद्रावरील लँडिंग साइटचे जे फोटो काढले आहेत, ते त्याच साइटवरील आधीच्या फोटोंबरोबर जुळवून पाहिले जातील. नासाची एलआरओसीची टीम या सर्व फोटोंचे विश्लेषण करेल. त्यातून येणारा निष्कर्ष सार्वजनिक केला जाईल.
७ सप्टेंबरला विक्रमने चंद्रावर ज्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित होते. तिथे आता कातरवेळ सुरु आहे. अंधार पडण्याआधीची जी वेळ असते तशी स्थिती आहे. सूर्य मावळतीची वेळ असल्याने मोठया सावल्या तयार होतात. ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साइटवरुन गेला त्यावेळी तिथे कातरवेळ होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोठा भाग हा सावल्यांनी व्यापलेला होता. लँडर त्यावेळी सावलीखाली झाकला गेला असावा असे जोशुआ ए हँडल यांनी सांगितले. ते नासाच्या प्लॅनेटरी सायन्स विभागाचे अधिकारी आहेत.
ऑर्बिटरला या उड्डाणामध्ये लँडर सापडण्याची शक्यता खूप धुसर होती याच्याशी तज्ञही सहमत आहेत. सूर्य मावळतीकडे असल्याने स्पष्ट फोटो मिळण्याची शक्यता कमी होती. लँडर जर चंद्रावरील उंचवटयाच्याजवळ असेल तर तो सावलीखाली झाकला जाण्याची शक्यता आहे. पुढच्या उड्डाणाच्यावेळी ऑर्बिटरला लँडरचे अधिक चांगले फोटो मिळू शकतात, असे अवकाश तज्ञ जतन मेहता यांनी म्हटले आहे.