चिपळूण-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। चिपळूणमध्ये आयोजित कृषी महोत्सवात बोलत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अचानक चक्कर आल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात असतानाच राणे यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांचा आवाज बसला आणि तब्येत बिघडल्याने त्यांनी भाषण अर्ध्यावरच थांबवले.
वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सव बहाद्दरशेख नाका येथील स्वा. वि. दा. सावरकर मैदानात सुरू असून हा महोत्सव ९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. उद्घाटनानंतर सुरू झालेल्या भाषणादरम्यान काही वेळातच राणे यांना चक्कर येऊ लागली. आवाज बसल्यामुळे त्यांना स्पष्टपणे बोलताही येईना, त्यामुळे त्यांनी उपस्थितांची माफी मागत भाषण आटोपते घेतले.

या घटनेनंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. कार्यक्रमस्थळावरून ते थेट गेस्टहाऊसकडे रवाना झाले. त्यांच्या तब्येतीबाबत उपस्थितांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती, मात्र आयोजकांकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सवात नारायण राणे व त्यांच्या पत्नीने नंदीचे दर्शन घेतले होते. यावेळी पारंपरिक गीतांचे सादरीकरण करण्यात आले. राणे दाम्पत्याने नंदीचे दर्शन घेऊन दक्षिणा अर्पण केली होती. त्यानंतर उद्घाटन सोहळा पार पडला आणि पुढे भाषण सुरू झाले, मात्र तब्येतीच्या कारणामुळे ते पूर्ण होऊ शकले नाही.
दरम्यान, या घटनेपूर्वीच रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. आयुष्यात मिळालेली सर्व पदे ही स्वकर्तृत्वावर मिळाल्याचे सांगत, लोकसभेची उमेदवारी नको असल्याचे आपण आधीच सांगितले होते, तरीही तिकीट मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. मात्र आता कुठेतरी थांबायला हवे, असे वाटत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले.
तसेच काही दिवसांपूर्वी निलेश राणे आणि नितीश राणे यांच्यात झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. कुटुंबातील मतभेदांपेक्षा सार्वजनिक जीवनात जबाबदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सूचित केले.



