मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिशा सालियनच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आपल्याला दोनदा फोन आला होता असे सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांची पोलिसांनी तब्बल नऊ तास चौकशी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी धक्कादायक दावा केला आहे. माझ्या जबाबात मी सुरुवातीपासून घडलं ती माहिती आणि आम्ही जे बोलत होतो ते सांगितलं. ते म्हणाले की, दिशा सालियानची ८ जून आणि सुशांतची १३ जूनला हत्या झाल्यानंतर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा फोन आला होता. तुम्ही सुशांत आणि दिशाच्या केसबाबत बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका. मी बोललो मी एक लोकप्रतिनिधी आहे, का बोलू नको? तर तु्म्हालाही मुलं आहेत. तुम्ही असं काही करु नका. मात्र, माझं हे वाक्य माझ्या जबाबातून वगळण्यात आलं असल्याचं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
नारायण राणे पुढे म्हणाले की, दिशा सालियनबद्दल आम्ही जे काही पत्रकार परिषदेत बोललो होतो की, खरे आरोपी पकडले पाहिजे. तिची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली हे आम्ही वारंवार बोलत होतो. त्यामुळे दिशाच्या आईकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या. त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. आमची दिशा सालियनसाठी न्याय मिळवण्याची मागणी असताना तिची आई म्हणते बदनामी होते, अशी खोटी तक्रार पोलीस ठाण्याला दिली. पोलीस ठाण्याने ती केस घेतली आणि आम्हाला बसवलं. आम्ही ९ तास पोलीस ठाण्यात होतो, असं नारायण राणे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आम्हाला अधिकार आहे, कुणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवण्यासाठी लढण्याचा आम्हाला अधिकार आहे. दिशा सालियनवर अन्याय झाला. तिला न्याय मिळवण्याची आमची मागणी असताना आमच्यावर केस दाखल करण्यात आली. आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे. आम्ही या प्रकरणात शेवटपर्यंत जाणार. शेवटी मी अमित शाहांना फोन केला. त्यानंतर शेवट आमची स्टेटमेटं पुरी झाल्यानंतर सोडलेलं आहे, असं राणे म्हणाले.