पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभारामुळे संतप्त झालेले पंचायत समिती सदस्य ललीत वाघ यांनी वैद्यकीय अधिकार्यावर चप्पल उगारल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. यासह अन्य बाबींबद्दल विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य ललित वाघ हे १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता आरोग्य केंद्रात गेले असता केंद्राला कुलूप लावलेले आढळून आले. त्यामुळे वाघ माघारी फिरले. दुसर्या दिवशी म्हणजे रविवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुन्हा केंद्र बंद तर एकही कर्मचारी आढळला नाही. काही वेळात वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सयासे यांनी हजेरी लावताच पंचायत समितीचे सदस्य ललित वाघ यांनी त्यांना आरोग्य केंद्र बंदबाबत व आशा स्वयंसेविकांच्या मानधनाविषयी माहिती विचारली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानेे संतप्त झालेल्या वाघ यांनी त्यांच्यावर चप्पल उगारली.
गेल्या एप्रिल महिन्या पासून बांबरुड कुरंगी गटातील ४२ आशा स्वयंसेविकांना मानधन मिळालेले नाही. या बाबत अनेक पंचायत समितीचे सदस्य ललित वाघ यांनी अनेकदा दुरध्वनीवरून डॉ. ज्ञानेश्वर सयासे यांना तक्रारींबाबत माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तसेच आरोग्य केंद्र बंद असल्याने परिसरातील रूग्णांची गैरसोय होत असल्याचेही दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर, ललीत वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या सर्व प्रकरणाचे त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपण केले.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून कारवाईसाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी दिली.
पहा या नाट्यमय घटनेचे ललीत वाघ यांनी केलेले लाईव्ह प्रक्षेपण.
https://www.facebook.com/lalitrwagh/videos/3123415561077822