Home राजकीय ‘लाडकी बहीण’ योजनेला अजितदादांचे नाव द्या! अमोल मिटकरींची मागणी; पंकजा मुंडेंचा पाठिंबा

‘लाडकी बहीण’ योजनेला अजितदादांचे नाव द्या! अमोल मिटकरींची मागणी; पंकजा मुंडेंचा पाठिंबा


लातूर-वृत्तसेवा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्यापही धक्क्यात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेनंतर आता अजितदादांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली ‘लाडकी बहीण’ योजना आता त्यांच्या नावाने ओळखली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही आग्रही मागणी केली असून, यावर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने राजकीय वर्तुळात या विषयाची चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी आधारवड ठरली आहे. या योजनेला आता ‘अजित दादांची लाडकी बहीण’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. ही केवळ एक मागणी नसून अजितदादांना वाहिलेली ती एक मोठी आदरांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. दादांच्या आठवणी राज्यातील बहिणींच्या मनात कायम राहाव्यात हाच यामागील मुख्य उद्देश असून, योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असल्यास काही तांत्रिक बदल करावेत, असेही मिटकरी म्हणाले. या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र देऊन अधिकृत विनंती करणार आहेत.

लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मिटकरींच्या मागणीबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव देण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, मात्र या मागणीला आमचे पूर्ण समर्थन राहील. कोणत्याही शासकीय योजनेचे नाव बदलण्याचा अधिकार हा राज्य मंत्रिमंडळाला असतो, त्यामुळे मुख्यमंत्री यावर योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound