पंचकुला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत विजयानंतर भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आहे. 17 ऑक्टोबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. राज्यपाल बंडारू दत्तात्रेय नवीन सरकारच्या मंत्र्यांना पदाची शपथ देतील. गुरुवारी सकाळी 10 वाजता परेड ग्राउंड, सेक्टर 5, पंचकुला येथे शपथविधी सोहळा होणार आहे. भाजप नेते नायब सिंग सैनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नायब सिंह सैनी 17 ऑक्टोबर रोजी पंचकुलाच्या सेक्टर-5 येथील परेड ग्राऊंडवर सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, आम्हाला पंतप्रधानांची मंजुरी मिळाली आहे असून मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद 17 ऑक्टोबर रोजी पंचकुलामध्ये शपथ घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.