मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे मंत्रीमंडळात लोकनियुक्त नगराध्यक्षपद निवडीची घोषणा झाली असतांना राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच जाहीर केलेल्या ९२ नगरपालिका आणि ४ नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचे जाहीर केले आहे. परिणामी जिल्ह्यातील ९ नगरपालिकांच्या निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, काही दिवसांपूर्वीच राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यात नगरपालिकांसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होऊन १९ रोजी मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय देईपर्यंत प्रक्रिया सुरू न झालेल्या निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिले होते. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्षपदांच्या निवडणुका होतील असे जाहीर केले. याप्रसंगी त्यांनी आधीच्या निवडणुकांना स्थगिती मिळणार असल्याचे सूतोवाच केले होते. यानुसार आता नगरविकास खात्याने जीआर काढून नगरपालिका निवडणुका स्थगित केल्या आहेत.
या संदर्भातील नगरविकासच्या जीआरमध्ये पुढील सूचना येईपर्यंत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. सर्वोच्य न्यायालयात विशेष अनुमती याचिकेची 12 जुलै रोजी सुनावणी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासप्रवर्गाबाबत (OBC) दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी दि. 19 जुलै रोजी ठेवलेली आहे. या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी जाहीर केलेला राज्यातील निवडणूक कार्यक्रम स्थगित केला आहे. सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे आयोगाने आज स्थगिती आदेशात म्हटले आहे. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता आता लागू राहणार नाही, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.