जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात आज गुरु नानक जयंतीनिमित्त भव्य आणि दिमाखदार नगरकीर्तन मिरवणूक काढण्यात आली. गुरुद्वारातून निघालेल्या या शोभायात्रेत सिख समाजातील भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. श्रद्धा, सेवा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत धार्मिक रंगसंगती आणि शिस्तबद्धता पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले.

गुरु ग्रंथ साहिब यांच्या छत्रछायेखाली फुलांच्या हारांनी सजवलेल्या पालखीसह मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीत पंच प्यारे भगव्या ध्वजांनी सजून अग्रेसर होते. त्यांच्या मागोमाग शहरातील भाविक मोठ्या संख्येने ‘वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह’चा घोष करत चालले होते. भगव्या वस्त्रांमध्ये सजलेले तरुण आणि महिला भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

तरुणींच्या गटांनी मिरवणुकीच्या मार्गावर सेवा भावाने रस्ते स्वच्छ केले, तर तरुणांनी पंजाबातील पारंपरिक खेळ सादर करून वातावरण अधिक रंगतदार केले. भक्ती, शिस्त आणि आनंदाचा अनोखा संगम असलेल्या या नगरकीर्तनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
या मिरवणुकीचा प्रारंभ शहरातील गुरुद्वारातून करण्यात आला. चित्रा चौक, टॉवर चौक, जवाहरलाल नेहरू पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आणि स्टेडियम चौक असा मार्गक्रमण करत मिरवणूक पुन्हा गुरुद्वारात दाखल झाली. मार्गात नागरिकांनी फुलांच्या वर्षावाने भाविकांचे स्वागत केले. धार्मिक गीतांचा नाद आणि भक्तीभावाने भारलेले वातावरण शहरभर पसरले होते.
ही मिरवणूक गुरु नानक देवजींच्या शिकवणींप्रमाणे मानवतेचा आणि सेवेचा संदेश देणारी ठरली. समाजात प्रेम, बंधुता आणि समरसतेचा संदेश देत ही शोभायात्रा यशस्वीपणे पार पडली.



