मुफ्ती हारून नदवी अपघातातून बचावले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा वरिष्ठ पत्रकार मुफ्ती हारून नदवी यांच्या कारचा आज सकाळी भीषण अपघात झाला असून ते या अपघातून बचावले आहेत.

कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस तथा व्हायरल न्यूज लाईव्हचे संपादक मुफ्ती हारून नदवी यांचा आज सकाळी एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. त्यांच्या कारचे टायर अचानक फुटल्याने वाहनाने चार-पाच कोलांट्या घेतल्या. यात कारच्या छताचे नुकसान होऊन आत बसलेल्या मुफ्ती हारून नदवी, त्यांचे कुटुंबिय आणि चालकाला मार लागला. हा अपघात इतका भीषण होता की, यातून कोणी वाचणार नाही असेच दिसून येत असतांना यात कोणतीही हानी झाली नाही. मुफ्ती नदवी आणि त्यांच्या कुटुंबियांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मुफ्ती हारून नदवी यांच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी तात्काळ रूग्णालयाकडे धाव घेतली. तर स्वत: मुफ्ती हारून नदवी यांनी समाजमाध्यमाच्या माध्यमातून आपण आणि आपले कुटुंबिय सुरक्षित असून अल्लाहच्या कृपेने आणि चाहत्यांच्या आशिर्वादांनीच आपण बचावले असल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे.

Protected Content