फलटण (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच माढा मतदार संघात येणाऱ्या फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीला तोंड फुटले आहे. आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दौऱ्यावर आले असताना त्यांच्यासमोरच शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे कार्यक्रमात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे पवार यांनाही आपले भाषण थांबवावे लागले.
शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आज ते या मतदारसंघात येणाऱ्या फलटण येथे आले होते. त्यावेळी जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यात आल्याने शेखर गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी घोषणाबाजीस सुरुवात केली. दरम्यान, शेखर गोरे स्टेजवर आले नाहीत. शरद पवार हे भाषणास उभे राहिल्यानंतर गोंधळ अधिकच वाढला. त्यामुळे त्यांना आपले भाषण थांबवावे लागले. या प्रकारामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा मतदारसंघात रा.काँ.समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आले.