Home क्राईम जंगलात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; पोलीस अधीक्षकांकडून पथकाचा सन्मान

जंगलात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; पोलीस अधीक्षकांकडून पथकाचा सन्मान


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४० वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची आणि तिचा मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना २५ जून, बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी पारोळा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत तपास करत एका संशयित आरोपीला २८ जून रोजी सायंकाळी ताब्यात घेऊन अटक केली आहे. हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला.

अशी घडली हृदयद्रावक घटना:
२५ जून रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण सुमठाणे शिवारातील सामाजिक वनीकरणाच्या जंगलात बकऱ्या चारून घरी परत येत होते. त्यावेळी त्यांना एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह गोणीत टाकून फेकलेला दिसला. मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

४८ तासांत उलगडला गुंता:
या गंभीर घटनेनंतर पारोळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जळगाव येथील पथकांनी तातडीने तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी खून झालेल्या महिलेची ओळख पटवली. मृत महिलेचे नाव शोभाबाई रघुनाथ कोळी (वय अंदाजे ४८, व्यवसाय घरकाम, रा. उंदीरखेडा, ता. पारोळा) असे निष्पन्न झाले.

शोभाबाई कोळी या त्यांच्या पतीसोबत उंदीरखेडा येथे राहत होत्या. त्यांचा मुलगा अंकलेश्वर येथे राहत असून, त्याची तब्येत बरी नसल्याने शोभाबाईंचे पती रघुनाथ कोळी मुलाकडे गेले होते. त्यामुळे शोभाबाई घरी एकट्याच असल्याचा फायदा घेऊन आरोपीने त्यांचा खून केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक:
या प्रकरणाचा सखोल तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलीस निरीक्षक सचिन सानप, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन, उपनिरीक्षक अमरसिंह वसावे, हवालदार सुनील हटकर, डॉ. शरद पाटील, अभिजीत पाटील, महेश पाटील, संदीप सातपुते, अनिल राठोड, आशिष गायकवाड, मिथुन पाटील, विजय पाटील, चतरसिंग मेहर, महिला कर्मचारी सविता पाटील यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पोलिसांनी संशयित आरोपीला २८ जून रोजी सायंकाळी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या खुनामागे नेमके काय कारण आहे आणि यात अजून किती जणांचा समावेश आहे, याचा उलगडा येत्या काळात होईल. पोलिसांच्या या जलद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound