पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील एका गावात घराच्या बांधकामाच्या कारणावरून एका ५५ वर्षीय वृद्ध महिलेला आणि त्यांच्या मुलीला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात आरोपी सतिष भानुदास बडगुजर याच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय वृध्द महिला ही आपल्या मुलीसह घरी असताना, त्यांच्या खाजगी जागेत घराचे बांधकाम सुरू होते. यावेळी शेजारी राहणारा संशयित आरोपी सतिष बडगुजर याने विनापरवाना त्यांच्या जागेत प्रवेश केला आणि जोरजोरात ओरडून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वृध्द महिला व त्यांच्या मुलीने त्याला विचारणा केली असता, “तुम्ही मला न विचारता घर कसे काय बांधता?” असे म्हणत त्याने रागाच्या भरात दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

“जर येथे घर बांधले तर मी तुला व तुझ्या परिवाराला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिली. या कृत्यामुळे व त्याने केलेल्या अश्लील वर्तनामुळे फिर्यादी आणि त्यांच्या मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न करत विनयभंग केला. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



