मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी आपणच पक्षाला प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. साधारणपणे मोदी आणि शाह यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन फडणवीस यांना धक्का दिल्याचे मानले जाते. फडणवीस यांनी मात्र या कार्यक्रमात या नाट्यामागे रंगलेले कथानक सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मते उध्दव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्याकडे गुदमरत असलेल्या एकनाथ शिंदे यांना घेऊन राज्यात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न मी केला. याबाबत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव देखील मी दिल्लीतील वरिष्ठांना दिला. त्यांना याला हिरवा कंदील दाखविण्यासाठी काही काळ घेतला. यानंतर राज्यात सत्तांतर झाले. खरं तर मला भाजपचे प्रदेशाध्यक्ष अथवा पक्ष देणार ती जबाबदारी हवी होती. तथापि, मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असा वरिष्ठांचा आदेश आल्यावर मला धक्का बसला. तथापि, पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण हे पद घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, फडणवीस यांनी या कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले. आपण त्यांचा कोणताही शब्द टाळला नाही. मुख्यमंत्री असतांना अनेकदा मी मातोश्रीवर जात असे. मात्र त्यांनी खंजीर खुपसला. आणि याचमुळे राज्यात सत्तांतर झाल्याचे फडणवीस म्हणाले.