मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात बेकायदा मुरुम उपशावर कारवाई थांबवण्यासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला गेला आणि त्यानंतरचा संवाद व्हिडिओ स्वरूपात सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणानंतर अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकेचा भडीमार झाला. मात्र आता, या प्रकरणावर स्वत: अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली असून, पोलीस प्रशासनाबद्दल आपल्याला पूर्ण आदर असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
कुर्डू गावातील नागरिक व स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर मुरुम उपशावर सुरू असलेली कारवाई थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा जगताप यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्याशी थेट संपर्क केला. त्यानंतर अजित पवार यांनी घटनास्थळी असलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना फोन करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. या संभाषणात, “डीसीएम अजित पवार बोल रहा हूँ… ये कारवाई बंद करो…मेरा आदेश है…” अशा शब्दात आदेश देताना त्यांचा रागावलेला सूर स्पष्ट जाणवत होता. पुढे अजित पवार म्हणाले, “इतनी डेरिंग है तुम्हारी?… मेरा चेहरा तो पहचानोगी ना…” या शब्दांमुळेच वाद अधिक चिघळला.

या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. अनेकांनी यावर टीका केली की, एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना असा अवमानकारक सूर अजित पवारांसारख्या वरिष्ठ नेत्याला शोभत नाही. विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तर “अजित पवारांची शिस्त आता कुठे गेली?” असा सवालही केला.
या टीकांनंतर अजित पवारांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपली बाजू मांडली. ते म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित काही संवादाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करणे नव्हता. उलट परिस्थिती बिघडू नये आणि शांतता राखावी, यासाठीच मी बोललो. पोलीस दल आणि विशेषतः महिला अधिकारी यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वोच्च आहे आणि मी बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाईसाठी कटिबद्ध आहे.”
सदर प्रकारातून स्थानिक राजकारण, प्रशासकीय हस्तक्षेप आणि कायद्याची अंमलबजावणी यांच्यातील सीमारेषा स्पष्ट होत असून, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा संवादांची व्याख्या आणि त्याचे परिणाम यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.



