जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथील ग्रामपंचायतीच्या मालकीची जुनी टाकी पाडून काढलेले लोखंडी भंगाराची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. भंगार चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी कानळदा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी जळगाव तालुका पोलीसात तक्रार दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील पाणीपुरवठा करणारी टाकी ही जीर्ण झाली होती. टाकी पाडण्यात यावी असा ठराव कानळदा ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी टाकी पाडण्यास सुरूवात केली. व त्यातून निघणारे शेकडो किलोचे भंगार काढण्यात आले. परंतू टाकी पाडून भंगार विकण्यासंदर्भात कोणताही ठराव मंजूर नसतांना संबंधित कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी परस्पर विक्री केले. तसेच उर्वरित भंगार हे कानळदा गावातील ग्रामपंचायत कर्मचारी पप्पु चव्हाण यांच्या खळ्यात आढळून आले. त्यातील बरेचसे भंगार विक्री करण्यात आले आहे. दरम्यान कोणताही भंगार विक्री अथवा देण्याबाबत ग्रामपंचायतीचा ठराव नसतांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परस्पररित्या ग्रामपंचायत मालकीचे मालमत्तेचे भंगार विक्री करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी एका लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
या निवेदनावर उपसरपंच रूपाली सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य कविता सपकाळे, त्रीवेणी सपकाळे, संगिता बाविस्कर, प्रतिभा भंगाळे, हर्षा सपकाळे, वासंती राणे, निवृत्ती बोरोले, सुकलाल सालोटे, जगदीश सपकाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.