जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रसिद्ध बालगंधर्व खुले नाट्यगृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रविवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता काही तरुणांनी नाट्यगृहात मद्य आणि मांसाहाराची पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेची माहिती मिळताच महापालिका आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ छापा टाकला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, इतर चौघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे.
बालगंधर्व नाट्यगृहात मद्य आणि मांसाहार शिजवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. याची तक्रार मिळताच महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले आणि बांधकाम अभियंता आर.टी. पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी पोलिसांनाही माहिती मिळाल्याने डायल ११२ च्या पथकासह जिल्हापेठ पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलीस पाहणी करत असताना पार्टी करणाऱ्यांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, तर चौघे पसार झाले.

पोलिसांना संशय आहे की, बालगंधर्व नाट्यगृहाच्या मागील बाजूस असलेल्या मोकाट गुरांच्या कोंडवाड्याचा दरवाजा उघडा असल्यामुळे आरोपी आत शिरले. पोलिसांनी घटनास्थळी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि मांस शिजवण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी महापालिकेच्या बांधकाम विभागाने जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी करत असून, फरार चौघांचा शोध घेत आहेत.



