मुंबई प्रतिनिधी । शहरासह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाला आहे. तसेच पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकलसेवा उशिराने सुरु होणार आहे.
याबाबत माहिती की, मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, हार्बर 10 मिनिटे उशिराने, पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. पालघरमध्ये मुसळधार पाऊस असून, जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. वलसाड फास्ट पॅसेंजर, फ्लाइंग राणी यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील अनेक राज्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. 1 आणि 2 जुलैला विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 जुलैला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. 3 जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, तर 4 जुलैला कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.