Home क्राईम तरूणाच्या खुनाने हादरले जळगाव : परिसरात प्रचंड खळबळ !

तरूणाच्या खुनाने हादरले जळगाव : परिसरात प्रचंड खळबळ !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेल्या जळगावात आज पुन्हा एका तरूणाचा खून झाल्याने परिसर हादरला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता दिक्षीत वाडी शेजारील एमएसईबी कार्यालयाजवळ निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात ६ ते ७ जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून विशालला संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

​रात्री तीन वाजता थरार

​प्राप्त माहितीनुसार, विशाल मोची हा पंचमुखी हनुमान मंदीराजवळ वेल्डींग दुकानावर काम करतो. सोबत तो सोलर पॅनेलच्या बेस बसविण्याचे कामही करतो. रविवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री काम उरकवून तो तुकाराम वाडी येथे राहत असलेल्या काकाच्या घरी रात्री थांबला होता. दरम्यान मध्यरात्री या परिसरात विद्यूत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे विशाल हा त्यांचा काकाचा मुलगा आकाश जनार्दन मोची आणि मित्र राहूल भालेराव हे तक्रार करण्यासाठी दिक्षीत वाडी येथील महावितरण कार्यालयात केले होते. विशाल मोची याच्यावर ६ ते ७ हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी वार झाल्याने विशाल जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि जिल्हापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.

​हत्येचे कारण अस्पष्ट, तपास सुरू

​विशाल मोची हा रामेश्वर कॉलनी येथे राहत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ उदय आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे जळगावातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


Protected Content

Play sound