मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील चारठाणा येथील २२ वर्षीय तरूणाला जिलेटीनचा स्फोट करून उडविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चारठाणा येथील आकाश कोळी (वय २२ वर्ष) हा तरूण नेहमीप्रमाणे बाहेर खाटवर झोपलेला होता. रात्री दोन वाजेच्या सुमारास त्याच्या खाटेच्या खाली अचानक स्फोट झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. अचानक झालेल्या आवाजाने परिसरातील लोक जागे झाले असता त्यांना हा प्रकार समजला. याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना देण्यात आली. पोलीस पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता त्या तरूणाच्या खाटेच्या खाली जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. यामुळे आकाश कोळी याला जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट करून उडविण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे. सहसा अशा प्रकारे कुणी खून करत नसल्यामुळे हा प्रकार पाहून पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.