Home धर्म-समाज कुणबी पाटील समाजासाठी सभागृह उभारणीसाठी पालिकेचे प्रयत्न – नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील

कुणबी पाटील समाजासाठी सभागृह उभारणीसाठी पालिकेचे प्रयत्न – नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरात कुणबी पाटील समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर असून समाजाकडून वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबविले जातात. मात्र स्वतःचे सभागृह नसल्यामुळे या कार्यक्रमांच्या आयोजनात अनेक अडचणी निर्माण होत असल्याची भावना समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून समाजासाठी हक्काचे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

ता. ५ रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीज महोत्सवानिमित्त पारोळ्यात आयोजित अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अॅड. रोहन मोरे, नगरसेवक राजेंद्र कासार, भूषण टिपरे, मनोज जगदाळे, दीपक अनुष्ठान, छोटू पाटील, प्रमोद कासार, सुदाम चौधरी, अशोक वाणी, विनोद पाटील, मनीष पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, लेखापाल भगवान पाटील, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील, पत्रकार प्रकाश पाटील, सद्गुरू महिला उद्योगच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील तसेच कुणबी पाटील समाज मंडळाचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून समाजात जनजागृती केली आणि लोकांना अध्यात्मिक तसेच सामाजिक मार्गदर्शन केले. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला हा अभिवादन सोहळा समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे.

ते पुढे म्हणाले की, पारोळा शहरात कुणबी पाटील समाजाची संख्या मोठी असल्याने समाजासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज सभागृह असणे आवश्यक आहे. समाजाने यासाठी पुढाकार घेतल्यास पालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक प्रयत्न केले जातील. त्यानंतर आमदार अमोल पाटील यांच्या सहकार्याने आमदार निधीतून आधुनिक सुविधांनी युक्त असे सभागृह उभारण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपनगराध्यक्ष अॅड. रोहन मोरे यांनी आपल्या मनोगतात कुणबी पाटील समाजाने एकजुटीने राबविलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. समाजाच्या विविध उपक्रमांना नगरपालिका प्रशासनाकडून नेहमीच सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दरम्यान, समाजाने एकत्र येऊन समाजाभिमुख उपक्रम राबविल्याबद्दल आमदार अमोल पाटील यांनीही विशेष कौतुक केल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले, तर अध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव लक्ष्मीकांत पाटील, सहसचिव शिवाजी गाडीवान, खजिनदार विनोद पाटील तसेच संचालक संजय पाटील, विकास पाटील, प्रफुल्ल पाटील, कैलास गाडीवान, रोशन पाटील, मंगेश पाटील, संजय नाना पाटील, जितेंद्र पाटील, महेंद्र पाटील आणि विश्वनाथ पाटील यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound