जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावात गणेश विसर्जन नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मनपा सभागृहाची किल्ली वेळेवर न मिळाल्याने गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी तब्बल अर्धा तास पदाधिकारी सभागृहाबाहेर ताटकळत उभे होते, तर दुसरीकडे मनपाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला गैरहजर राहिल्याने गणेश महामंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे मनपाच्या नियोजनशून्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सभागृहाच्या किल्लीसाठी अर्धा तास प्रतीक्षा
गणेश मंडळांच्या बैठकीचे आयोजन मनपा प्रशासनाने केले होते. यासाठी पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, बैठकीच्या नियोजित वेळेला सभागृहाची किल्ली उपलब्ध नसल्याने सर्वजण बाहेरच थांबून राहिले. या गोंधळामुळे बैठकीची सुरुवात उशिरा झाली, ज्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीच्या नियोजनातील ही पहिलीच चूक गंभीर मानली जात आहे.

मनपा आयुक्तांची बैठकीला दांडी
या महत्त्वपूर्ण बैठकीला मनपा आयुक्त आणि उपायुक्त हे दोघेही अनुपस्थित होते. त्यांच्या वतीने कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता, केवळ दोन कर्मचारी एका कोपऱ्यात शांतपणे बसून होते. मनपाच्या या निष्काळजी वृत्तीमुळे गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी नाराजी व्यक्त केली. “दोन तास चाललेल्या बैठकीत मनपाच्या वतीने साधे पाणीही विचारले गेले नाही,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. शहराच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या नियोजनासाठी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
पोलीस आणि मंडळांचे सहकार्य
दरम्यान, या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी गणेश मंडळांना विसर्जनाच्या नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले. महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनीही जळगाव शहरातील मंडळांनी केलेल्या भव्य सजावटी पाहण्यासाठी नागरिकांना मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन केले.



