शिर्डी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाचं शिर्डीत आज महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनासाठी राज्यातील भाजपाचे सर्व दिग्गज नेते आणि राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते.
भाजपाचे हे अधिवेशन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे मानले जात आहे. या अधिवेशनातून भाजपाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. याच अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचा सर्वोच्च न्यायालयातील निर्णय झाला तर पुढील तीन-चार महिन्यांत या निवडणुका होतील’सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे. तो निर्णय आल्यानंतर या निवडणुका होतील. विधानसभेत विजय मिळवला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान विरोधी शक्ती, अराजकतावादी शक्तींचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात पाहायला मिळाला. भाजप आणि मोदींना पराभूत करता येत नाही, असे जेव्हा काँग्रेस, उबाठा, शरद पवारांची पार्टी यांना वाटले, तेव्हा त्यांनी अराजकातावादी सारख्या शक्तींना एकत्र घेऊन या देशात अराजकाता पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. या महाराष्ट्रात व्होट जिहाद, फेक नरेटीव्ह बघितला. परंतु, गेल्या सहा महिन्यात राष्ट्रीय विचारांच्या संघटनांची एकत्र येऊन राष्ट्रवादाचे पुन्हा रोपण केले आणि अराजकतावादी ताकदींना विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे पराभूत केले. त्यांना पराभूत केले, तरी त्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी केला.