मतदार यादीतील ‘घोळ’ निस्तरेना; महापालिका निवडणूका लांबणीवर जाण्याची शक्यता !


मुंबई -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा  । आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. मतदार याद्यांमधील त्रुटी आणि दुबार मतदारांचा घोळ अद्यापही पूर्णपणे निस्तारलेला नसल्याने, राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यासाठी ५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या महत्त्वाच्या बदलामुळे महापालिका निवडणुका निर्धारित वेळेत होणे कठीण झाले असून, त्या जानेवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लाखो दुबार मतदारांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मूळ मुदत १० डिसेंबर होती, पण याद्यांची शुद्धी पूर्ण न झाल्याने ही मुदत वाढवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याने आयोगाने अखेरच्या टप्प्यात हा निर्णय घेतला.

याद्या जाहीर करण्यास होणारा विलंब आणि त्यानंतर राजकीय पक्ष किंवा इच्छुक उमेदवारांनी त्रुटींवर आक्षेप घेतल्यास संपूर्ण निवडणूक कार्यक्रम आणखी पुढे ढकलला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. जर यादीतील घोळाप्रकरणी काही याचिका न्यायालयात दाखल झाल्यास, संपूर्ण वेळापत्रक मोठ्या प्रमाणात बाधित होऊ शकते.

दुसरीकडे, नागपूर आणि चंद्रपूरसह काही महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले असले तरी, ५० टक्के आरक्षणावरील सुनावणी प्रलंबित आहे. या महापालिकांचा निवडणूक निकाल आरक्षण याचिकांच्या निकालाशी अधीन असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे आणि आरक्षणासारखे कायदेशीर गुंते सोडवणे यासाठी अधिक वेळ लागणार आहे.

परिणामी, डिसेंबर अखेर होणारी जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता असून, सर्व निवडणुका आता जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाकडे आणि उच्च न्यायालयातील संभाव्य याचिकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.