जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या पहिल्याच प्रशिक्षण वर्गाला मोठ्या प्रमाणावर गैरहजेरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी आयोजित प्रशिक्षण वर्गाला नियुक्त करण्यात आलेल्या तब्बल ९९ कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले असून, त्यापैकी ६० कर्मचाऱ्यांनी अद्याप कोणताही खुलासा सादर न केल्याने त्यांच्यावर कारवाईचे संकट ओढावले आहे.

जळगाव महापालिकेच्या ६३ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी २७८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे सोमवारी पहिले प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी २६८७ कर्मचारी उपस्थित होते, मात्र ९९ कर्मचारी गैरहजर राहिले.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि कर्तव्याबाबत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी यापूर्वीच स्पष्ट आदेश दिले होते. असे असतानाही पहिल्याच प्रशिक्षण वर्गाला कर्मचाऱ्यांनी अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब मानली जात आहे. निवडणूक प्रक्रियेत शिस्त व वेळेचे महत्त्व अधोरेखित करत आयुक्त ढेरे यांनी याकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठ्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. पहिल्या प्रशिक्षण वर्गाला अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून रजा अर्ज आले होते का, त्यातील किती बीएलओ आहेत, याबाबत सध्या सखोल पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेनंतर गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून दोन दिवसांत खुलासा सादर करण्यास सांगण्यात येणार आहे.
जर ठरलेल्या मुदतीत समाधानकारक खुलासा सादर झाला नाही, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिला आहे. निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.



