जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या विशेष सभेत ‘स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव’ या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा झाली असून, सामाजिक संस्था ‘सुधर्मा’ने या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवत स्वच्छता व्यवस्थेबाबत अनेक ठोस आणि उपयुक्त सूचना मांडल्या. या सूचनांमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगाव मनपा सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत ‘सुधर्मा’चे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी महापौरांना लेखी निवेदन सादर केले आणि उपस्थित सदस्यांसमोर ते वाचून दाखवले. या निवेदनात शहरातील कचरावेचक महिला व मुलांसाठी विशेष उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे.

सुधर्माने मांडलेल्या प्रमुख सूचनांमध्ये कचरावेचक महिलांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून अधिकृत मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कडक उन्हात काम करणाऱ्या या महिलांना संरक्षणासाठी सनकोट, हॅन्ड ग्लोज आणि पांढरे रुमाल देण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत वर्षातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.
याशिवाय महानगरपालिकेच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक वार्डात दोन ज्येष्ठ नागरिक, दोन महिला, घंटागाडी कर्मचारी आणि सफाई सुपरवायझर यांचा समावेश असलेला एक गट तयार करण्याचा प्रस्तावही पुढे आला. या गटाच्या माध्यमातून दर रविवारी सकाळी स्वच्छता फेरी काढून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे.
महिन्याच्या शेवटी महापौरांनी या उपक्रमांचा आढावा घ्यावा तसेच दर तीन महिन्यांनी नागरिकांच्या बैठका घेऊन नियोजन करावे, अशीही सूचना करण्यात आली. नागरिकांकडून सूचना मागवण्यासाठी आठ दिवसांच्या आत लेखी किंवा ई-मेलद्वारे अभिप्राय घेण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. याशिवाय रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या किंवा थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
या सर्व सूचनांचे महापौरांनी स्वागत करत त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी महापौरांच्या हस्ते हेमंत बेलसरे यांचा सत्कार करण्यात आला आणि ‘पंच परिवर्तन’ हे पुस्तक भेट देण्यात आले.



