जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या आयटीआय ते प्रभात चौफुली या समांतर रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी महानगरपालिकेने संबंधित परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनेनंतर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते तसेच खडी, विटा, वाळू आदींचे विक्रेते यांच्यात हालचाल सुरू झाली असून, प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका विक्रेत्यांनी जाहीर केली आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात आयटीआय ते बहिणाबाई उद्यान या दरम्यानचा भाग मोकळा करण्यात येणार आहे. यासाठी उद्या सोमवार आणि परवा मंगळवारी या परिसरातील अतिक्रमण काढण्यात येणार असून, संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण न हटविल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. रस्त्याच्या कामासाठी आवश्यक जागा तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

प्रशासनाच्या सूचनेनंतर येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आम्ही स्वतःहून आमच्या गाड्या आणि साहित्य काढून घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. रविवारचा व्यवसाय पूर्ण झाल्यानंतर रात्रीच आपले साहित्य हटवू, जेणेकरून रस्त्याच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले. विकासकामांसाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पुन्हा याच परिसरात एका बाजूला किंवा अन्यत्र योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी विक्रेत्यांनी केली आहे. आम्ही हॉकर्स झोनमध्ये येतो आणि याच ठिकाणी महानगरपालिकेने आम्हाला पूर्वी व्यवसायासाठी जागा दिली होती, त्यामुळे कामानंतर पुन्हा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आयटीआय परिसरातील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने त्यांची गाडी जाळली होती. त्यानंतर बँकेकडून साडेचार लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी पुन्हा व्यवसाय उभा केला असून, आता रस्त्याच्या कामामुळे पुन्हा काही दिवस व्यवसाय बंद ठेवावा लागणार आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी भावना अनेक विक्रेत्यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स’शी बोलताना व्यक्त केली.



