जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने आता निर्णायक वळण घेतले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जळगाव शहरात राजकीय वातावरणाचा पारा कमालीचा वाढला आहे. सकाळपासूनच महापालिका प्रशासनाच्या वतीने अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, दुपारी ३ वाजेपर्यंत ही मुदत असणार आहे. त्यामुळे या शेवटच्या काही तासांत अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महापालिका परिसरात जनसागर, सुरक्षेचा कडक वेढा
आज सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह महापालिका आवारात मोठी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावून रस्ता सुरक्षित करण्यात आला आहे. केवळ उमेदवार आणि अधिकृत व्यक्तींनाच आत सोडले जात आहे.

पक्षांतर्गत रस्सीखेच आणि एबी फॉर्मची प्रतीक्षा
राजकीय वर्तुळात सध्या ‘एबी’ फॉर्मवरून मोठी धाकधूक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) कालच आपल्या काही उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्मचे वाटप केले असून, ते उमेदवार आज आपले अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) इच्छुक उमेदवारांना अद्यापही पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसाठी ताटकळावे लागत आहे. वरिष्ठांकडून कोणाला संधी मिळते आणि कोणाचा पत्ता कापला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंडखोरीचे ढग घोंगावणार?
यावेळच्या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता असल्याने राजकीय समीकरणे बिघडण्याची चिन्हे आहेत. अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी न मिळाल्यास तीव्र नाराजी असून, अनेकजण ‘अपक्ष’ किंवा बंडखोरीच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत किती जण अधिकृत उमेदवार म्हणून तर किती जण बंडखोर म्हणून अर्ज भरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. प्रशासनाच्या वतीने प्रत्येक उमेदवाराचा अर्ज अचूकपणे स्वीकारण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय सध्या हालचालींचे केंद्र बनले आहे.



