जळगाव प्रतिनिधी । शहरातील अनेक प्रभागांमध्ये विकासकामे सुरू आहे. परंतु मक्तेदारावर महापालिका प्रशासनाचे कुठलेच नियंत्रण दिसत नसून कामाची मुदत संपण्यात आली तरी ते काम पूर्ण होत नसून याकडे महापालिका अभियंत्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे म्हणत स्थायी समिती सदस्यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले.
जळगाव महापालिकेची गुरुवारी (ता. २५) स्थायी समितीची विशेष सभा सभापती राजेंद्र घुगे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. सभेत शिवसेना सदस्य नितीन बरडे यांनी शहरातील डांबरी रस्ते दुरुस्तीच्या कामांच्या चौकशीसाठी अहवालाची माहिती घेतली. या अहवालावर त्यांनी आक्षेप घेतला तसेच कामात कसूर दिसल्यास अधिकाऱ्यांच्या वेतनातून बिलांची वसुली करावे, अशी मागणी केली. यावर भाजप सदस्य कुलभूषण पाटील यांनी नियमानुसार कामे केलेल्या मक्तेदाराचे बिले अदा करावीत, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी तक्रारीनंतर प्राप्त अहवालानंतरच बिले अदा करण्यात येईल, असे सांगितले.
अनुकंपधारकांच्या नियुक्तीसाठी समिती
मनपाच्या अनुकंपधारकांच्या नियुक्तीसाठी राज्य शासनाने मार्ग मोकळा केला असून याबाबत लवकरात लवकर कारवाई करुन नियुक्त्या करण्यात याव्या, असे नितीन लढ्ढा यांनी सूचना मांडली. यावर आयुक्तांनी याबाबत अनावश्यक विलंब होणार नाही. यासाठी स्वतंत्र्य कमिटी स्थापन करण्यात येणार असून त्यावर अपर आयुक्तांचे नियंत्रण असे सांगितले.