
पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी घडलेल्या गॅस टँकर अपघातामुळे तब्बल २२ तास उलटून गेले तरीही वाहतूक कोंडी कायम असून हजारो प्रवासी अक्षरशः अडकून पडले आहेत. खंडाळा घाटातील बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली असून सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

या अपघाताचा फटका केवळ मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेपुरताच मर्यादित न राहता जुन्या मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गालाही बसला आहे. दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून अनेक प्रवासी रात्रीपासून रस्त्यावरच अडकले आहेत. २२ तासांहून अधिक काळ वाहतूक न हलल्याने प्रवाशांचे हाल झाले असून खाणे-पिणे, पाणी, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या वाहतूक कोंडीत अनेक महत्त्वाच्या कारणांसाठी प्रवास करणारे प्रवासी अडकले आहेत. लातूरहून मुंबईकडे येणारे एक कुटुंब कर्करोगग्रस्त रुग्णाला टाटा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन निघाले होते. सकाळी ८ वाजता रुग्णालयात पोहोचण्याच्या उद्देशाने रात्री १० वाजता प्रवास सुरू केला होता, मात्र पहाटे ४ वाजल्यापासून ते वाहतूक कोंडीत अडकले आहेत. याशिवाय काही प्रवाशांचा विमान प्रवास होता, परंतु या कोंडीमुळे त्यांना तिकीट रद्द करण्याची वेळ आली आहे.
अनेक वाहनचालकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. सकाळी ७ वाजता या कोंडीत अडकलेल्या एका टेम्पो चालकाने, वाहतूक कोंडीबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप केला. प्रशासनाने किमान एका बाजूची वाहतूक सुरू ठेवायला हवी होती, असे संतप्त प्रवाशांचे म्हणणे आहे. दीर्घकाळ अडकून राहिल्याने लहान मुले, वृद्ध आणि आजारी प्रवाशांची विशेष गैरसोय होत आहे.
मंगळवारी संध्याकाळी हा गॅस टँकर पलटी झाल्यानंतर रात्रीपासून पहाटे ४ वाजेपर्यंत गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्याला यश आले नाही. बुधवारी सकाळी पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले असून परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. वाहतूक कोंडीमुळे बचाव व तांत्रिक यंत्रणांनाही घटनास्थळी पोहोचणे कठीण जात आहे.
एनडीआरएफची टीम, टाटा कंपनीचे तांत्रिक पथक तसेच केमिकल तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून गॅस गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती हेल्प फाऊंडेशन रेस्क्यू टीमचे गुरुनाथ साठेलकर यांनी दिली. मात्र गॅस लिकेज पूर्णपणे थांबेपर्यंत वाहतूक सुरळीत होण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी प्रवाशांना मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. गॅस गळतीचे प्रमाण वाढल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून पुण्याकडे जाणारी वाहतूकही खालापूर टोलनाक्यापर्यंत कोंडीत अडकली आहे. पर्यायी मार्ग म्हणून ताम्हिणी घाटमार्गे कर्जत–रायगड, तसेच माळशेज घाट आणि आळेफाटा–ठाणे मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



